संविधान मुल्यांची पायमल्ली

प्रविण तरडे आणि संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली

प्रविण तरडे या मराठीतल्या नामांकीत अभिनेता आणि दिग्दर्शकाने आपल्या घरी संविधानावर एक पाट ठेऊन त्यावर गणेशमूर्ती बसवली. त्यामुळे संविधानावर निष्ठा असणाऱ्या आणि संविधानावर प्रेम असणाऱ्या कोणत्याही भारतीयांच्या भावना दुखणं साहजिकच आहे. संविधान हे काही कोणता धर्मग्रंथ नाही. न्यायालयाने सुद्धा मान्य केलंय की संविधानापेक्षा कोणताही धर्मग्रंथ मोठा नाही. संविधान हे फक्त एक पुस्तक नसून तो देशातील सर्वोच्च ग्रंथ आहे, जो प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार देतो. भारताचा कोणताही अधिकृत धर्म नसला तरी संविधानाने प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार, प्रसार आणि त्याचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत. पण समानता मानणाऱ्या भारतीय संविधानावर एखाद्या विशिष्ट धर्माची मूर्ती स्थापन करून तरडे यांनी निश्चितच संविधानाचा अपमान केला आहे. कायद्याचा पदवीधर म्हणवून घेणाऱ्या तरडेंनी खरंच संविधान वाचलंय का? आणि वाचलंय तर त्यांना ते कितपत कळलंय हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. Prevention of Insults to National Honour Act, 1971 नुसार जर कोणी भारतीय तिरंग्याचा, भारतीय संविधानाचा आणि भारतीय राष्ट्रगीताचा अपमान केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते हे तरडेंना माहीत नसेल का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. हजारो वर्षे गुलामीत जगणाऱ्या इथल्या दलित, आदिवासी आणि बहुजनांना समान अधिकार देऊन माणूस म्हणून जगण्याचा हक संविधाने प्राप्त करून दिला आणि हजारो वर्षाची गुलामगिरी संपवली तसेच इथल्या स्त्रियांना समाजव्यवस्थेने कोणतेच अधिकार दिले नव्हते तसेच त्यांना कसलेच स्वातंत्र्य दिले नव्हते आणि शिक्षणापासून वंचित ठेवले होते. त्यांना फक्त उपभोगाची वस्तू मानून पुरुषसत्ताक व्यवस्थेने गुलाम ठेवले गेले होते. त्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने आणून समान अधिकार आणि हक्क संविधानाने प्राप्त करून दिले आहे. अशा या संविधानाचा उठसुठ कोणीही येऊन अपमान केला जातो हे कुणीही कदापी खपवून घेणार नाही. पण प्रविण तरडे यांचा निषेध करायला फक्त दलित समाज आणि ठराविक संघटनाच पुढे आल्या बाकी कोणीही समोर आले नाही हे खरंच खूप दुर्दैवी आहे असे म्हणावे लागेल. 

तरडेंनी नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि माफी मागितली. माफी मागताना ते म्हणाले 'मी दलित समाजाची माफी मागतो'' पण मी असं म्हणतो की, इथं दलित समाजाचा काय संबंध? संविधान हे काय फक्त दलित समाजपुरतेच मर्यादित आहे का? बाबासाहेबांनी संविधान हे फक्त दलितांसाठी निर्माण केलं आहे का? तर हे संविधान संपूर्ण देशाचे आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला हे संविधान लागू पडतं.  देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे हक्क,स्वातंत्र्य आणि न्याय हे संविधान मिळून देतं हे तरडेंना माहित नाही का? तरडेंनी खरंच कायद्याचा अभ्यास केलाय का याविषयी शंका यानिमित्ताने उपस्थित होते. प्रविण तरडे हे संघाशी संबधित आहे हे सर्वश्रुत आहे. त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय की ते आज जो कोणी आहे ते संघामुळेच आहे. संघांनी त्यांच्या चित्रपटांना आणि नाटकांना पाठिंबा दिलाय असं ते सांगतात. त्यामुळे ही घटना प्रविण तरडे या एका व्यक्तिपुरती मर्यादित नाही तर त्यामागे संघाचा छुपा अजेंडा समोर दिसून येतो. संघाला सुरवातीपासून भारतीय राज्यघटना मान्य नाही. संघाचे हिंदुराष्ट्राचे स्वप्न हे संविधान जोपर्यंत आहे त्यामुळे पूर्ण होणार नाही आणि ते बदलल्याशिवाय हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकार होणार नाही हे संघाला माहीत आहे त्यामुळे संविधानाबद्दलची त्यांची असूया ही यानिमित्ताने दिसून येते. मागे काही दिवसांपूर्वी राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्यानंतर त्या गोष्टीचा विरोध करणारा आणि माध्यमांशी बोलणारे हेच तरडे होते. ज्या 'राजसन्यास' नाटकातून छञपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बदनामी केली त्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या समर्थनात हे तरडे आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी फेसबुक वर 'संपूर्ण देश भाजप सोबत आहे' असे बालिश विधान करून विनाकारण वाद ओढून घेऊन ट्रोलिंग ला सामोरे गेले होते. त्यामुळे सतत काहीना काही वाद निर्माण करून प्रसिद्धीझोतात येण्याचं काम तरडे हे करू पाहताहेत.

आधीच सत्तेवर असलेल्या लोकांनी संविधानाची मुल्ये पायदळी तुडवली आहेत त्यात अशा या घटना घडल्या जातात त्यामुळे काही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात. संविधानातील जो मूळ आत्मा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आहे, त्या मूळ आत्म्यालाच इथल्या व्यवस्थेने छेद दिल्याचे दिसून येते.  संविधानातील तीन मूल्यांपैकी असलेले एक मूल्य म्हणजे स्वातंत्र्य. सध्या स्वातंत्र्य हे फक्त नावापुरतेच दिसत आहे.  Contempt of the court च्या नावाखाली प्रशांत भूषण सारख्या वकिलांना दोषी ठरवले जाते. भीमा कोरेगाव प्रकरणी विचारवंतांना अर्बन नक्षलवादी ठरून अटक केली जाते आणि जामीनसुद्धा नाकारला जातो. 370 हटवल्यानंतर तेथील नेत्यांना विनाकारण अटक केली जाते आणि नागरिकांच्यावर बंधने लादली जातात. इंटरनेट बंद केली जातात. भाषण स्वातंत्र्य, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्तपणे वावरण्याचे स्वातंत्र्य आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य इत्यादी स्वातंत्र्याची गळचेपी काही वर्षात केल्याचं दिसून येतं. कोणीही एखादा सरकार विरुद्ध बोलला तर त्याला देशद्रोहीची लेबले लावली जातात.

संविधानाचे दुसरे मूल्य म्हणजे समानता. 2014 नंतर देशात एक विषमतेचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येतंय. सवर्ण मुलीशी प्रेम केले किंवा प्रेमविवाह केला म्हणून दलित तरुणांची हत्या केली जाते. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये घोड्यावर नवरदेव बसला म्हणून सवर्ण समाजातील काही समाजकंटकांनी वरातीवर दगडफेक केल्याचं आपण पाहिलं आहे. तसेच ओडिसा येथे काही दिवसांपूर्वी एका मुलीने बागेतले फूल तोडले म्हणून तिच्यासोबत गावातील 40 कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर 73 वर्षांनी जर हा भेदभाव चालूच असेल मग समानता आहे कुठे हा प्रश्न उपस्थित होतो.

तिसरे महत्वाचे मूल्य म्हणजे बंधुता. काही वर्षांमध्ये दोन समाजा-समाजामध्ये तसेच दोन धर्मा-धर्मामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू असल्याचा दिसून येतोय. गोमांस बाळगल्याप्रकरणी व्यक्तीची हत्या केली जाते. अनेक अल्पसंख्याक तसेच दलित लोकांचे मॉब लिंचिंग केलं जातं.  एखाद्या धर्माविषयी द्वेषभावना निर्माण करून त्यावर अवैचारिक टिका केली जाते.  तसेच विरोधी विचार मांडणाऱ्या व्यक्तींविषयी समाज माध्यमांतून चरित्रहनन केले जाते. महिलांविषयी अपशब्द वापरले जाते. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य भाषेत ट्रोलिंग केलं जातं. हे सर्व पाहिल्यावर असे कळते की संविधानाला प्रेरित असलेली बंधुता ही आहे कुठे?

संविधानाची ही मूल्य टिकली तरच संविधान टिकेल आणि संविधान आहे म्हणून देश एकसंघ आणि अखंड राहील. हे संविधान जपण्याचं हे आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जेव्हा जेव्हा संविधानावर आघात केला जाईल तेव्हा प्रत्येक भारतीयाने पेटून उठून त्याच्याविरोधात एकजुटीने आवाज उठवला पाहिजे. संविधान आहे म्हणूनच लोकशाही आहे आणि संविधान टिकले तरच लोकशाही टिकेल.

-स्वप्निल थोरवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे