बाळासाहेब आंबेडकर आणि पंढरी चा पांडुरंग
अॅड बाळासाहेब आंबेडकर आणि पंढरपूर मंदिर प्रवेश
(उत्तम जोगदंड)
अनेक बौद्ध बांधवांकडून, बाळासाहेब नेतृत्व करीत असलेल्या पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनावर, उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्यांनी कोणत्या देवाला नमन केले, कुठे तीर्थ-प्रसाद घेतला यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यावर पुढे लिहण्याआधी इंग्रजांच्या काळातील एक किस्सा सांगू इच्छितो. हा कितपत खरा आहे हे माहिती नाही, पण विचार करण्यासारखा आहे.
असे म्हणतात की त्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी पोर्तुगीज लोकांनी हिंदूंच्या विहिरीत पाव टाकले. अशा पाव टाकलेल्या विहीरीतील पाणी जे कोणी प्यायले असतील ते बाटले असे म्हटले जायचे. मग हे बाटलेले लोक नाइलाजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारायचे. म्हणजे हिंदू धर्म एवढा तकलादू होता का, कि पाव टाकलेल्या विहीरीतले पानी प्यायल्याने बाटला जाईल? यातील वास्तवाचा किंवा अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने बाटणे हा प्रकार अस्तीत्वात होता असे मानायला जागा आहे. हा झाला धार्मिक प्रकार.
आता वरील विषयाकडे वळू या:
बौद्ध हा 'धम्म' आहे धर्म नव्हे असे आपण सतत सांगत असतो. म्हणजे धर्म आणि धम्म यात फरक नक्कीच आहे. आपण असे म्हणतो की धम्म ही एक जीवनपद्धती आहे. समाजात एकमेकांशी आदर्श आचरण कसे करायचे हे सांगणारा, प्रज्ञा, शील, करुणा यांवर आधारित असा धम्म आहे. यानुसार तो माणसाला प्रबुद्ध बनवतो. विचारशील बनवतो, वैज्ञानिक दृष्टीकोण रुजवतो. मग प्रश्न असे आहेत की:
- हिंदू धर्म किंवा मनुष्य जसा पावाने बाटतो, अस्पृश्यांच्या स्पर्शाने बाटतो, मासिक पाळीवाल्या महिलेच्या स्पर्शाने बाटतो, तसा बौद्ध धम्म तत्सम किंवा अन्य कोणत्यातरी, कोणीतरी केलेल्या कृतीने बाटतो काय? एवढा तकलादू बौद्ध धम्म आहे काय?
- जर बाटत असेल तर मग धर्म आणि धम्म यात फरक काय राहिला?
- जर बाटत नसेल, तर अशा कोणीतरी, कोणत्यातरी केलेल्या कृतींना धम्माने किंवा धम्मबांधवाने का घाबरावे?
समजा एखादा बौद्ध बांधव, जो धम्माचे व्यवस्थित पालन करतो, त्याच्या हिंदू जिवलग मित्राकडे गेला व गणपतीपुढे फुले टाकली, तर त्यामुळे धम्मावर किंवा त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? तो बाटणार आहे का? लगेच त्याने आपली निष्ठा गणपति चरणी किंवा हिंदू धर्माच्या चरणी अर्पण केली असे होणार आहे काय. म्हणजे हे वरील पावाच्या उदाहरणासारखेच होईल की! (हे उदाहरण घरी गणपती बसवणार्या बौद्धांना लागू नाही. कारण बौद्ध स्वतःच्या घरी गणपती बसवूच शकत नाहीत).
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळेस हिंदू धर्मातील अनेक लोक, नेते बाबासाहेबांच्या आणि तथागतांच्या फोटो/मूर्तीसमोर फुले टाकून हात जोडतात. तेंव्हा त्यांचाकडे अशी बोंबाबोंब होते का की सदर नेता आता धर्म-भ्रष्ट झाला आणि बौद्ध झाला? हल्ली अनेक मुस्लिम सुद्धा सार्वजनिक गणपति मंडळाच्या गणपतीचे स्वागत करतात, अन्य धर्मीय लोक मुस्लिमांच्या इफ्तार पार्टीत सामील होतात. मग ते धर्मभ्रष्ट होतात काय?
मग आपणच असा अट्टहास का करतो? याला काही लोक म्हणतील की बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा (विशेषतः हिंदू धर्मातील देवांना नाकारणारा भाग) वाचा, मग बोला! बरोबर आहे. बौद्धबांधवांनी बावीस प्रतिज्ञा पाळाव्यात असे बाबासाहेबांनी का सांगितले? त्याची करणे इथे देत बसत नाही, सर्वांना माहिती आहेत. परंतु बाबासाहेबांनी हे तर सांगितले नाही ना की तुम्ही हिंदू धर्मियांशी फटकून रहा? बाबासाहेबांचा भर सर्वसमावेशकतेवर, सहजीवनावर होता. त्यानुसार आपण समाजाचा एक भाग म्हणून अन्य लोकांशी फटकून न वागता खेळीमेळीने समस्त समाजाचा एक भाग म्हणून राहायला पाहिजे. परंतु आपण आपली 'कट्टरता' दाखवू पहात आहोत. याचा अर्थ आपण घरी गणपती बसवावेत, देव्या बसवाव्यात असा नाही. पण अन्य हिंदू मित्रांनी गणपती बसवला असेल तर आणि त्याने प्रेमाने बोलावले असेल तर त्याच्याकडे गेल्याने आपण धम्मावर नक्की कोणता आघात करीत असतो. तो हिंदू असल्याने त्याला हिंदू धर्म पाळण्याचे संवैधानिक स्वातंत्र्य आहे. आपण त्यांच्याकडे त्यांच्या आमंत्रणवरून गेलो तर उद्या तो आपल्याकडे आपल्या आमंत्रणावरून येईल आणि यातूनच सामंजस्य वाढेल की. याला वेळ लागू शकेल. मैत्री शिकवणार्या बुद्धाचा मार्गावर चालनार्यासाठी हा मार्ग योग्य की एकमेकांकडे पाठ फिरवून शत्रू म्हणून वागणे योग्य? विचार करावा!
मित्रांनो महाराष्ट्रात बौद्धांची लोकसंख्या फक्त ६५.३१ लाख (२०११ जनगणना) म्हणजे ५.८१ टक्के आहे. याशिवाय ९८.८१ लाख अनुसूचीत जातीचे लोक आहेत. शिवाय ओबीसी आणि अनुसूचीत जमातीचे मिळून प्रचंड प्रमाण आहे. हे लोक खरे तर बौद्ध धम्मात यायला हवेत. (खरे तर देशभरातील हे लोक यावेत) परंतु हे आपल्याकडे यावेत म्हणून आपण काय करत आहोत? आपण 'कट्टर' बौद्ध बनून या लोकांपासून स्वतःला असे काही वेगळे समजत आहोत की हे लोक आपल्यापासून दोन हात दूर राहणेच पसंत करतात. आपण त्यांच्याकडे जाऊन तसेच ते आपल्याकडे येऊन जेंव्हा त्यांना कळेल की हे लोक तर धम्म स्वीकारून खूप चांगले झालेले आहेत, तेंव्हाच तर ते आपल्या धम्माविषयी योग्य विचार करतील ना? त्यांनी समजा धर्मांतर नाही केले परंतु आपले बघून त्यांनी त्यांचे देव सोडले, स्वतःला ब्राह्मणी जोखडातून मुक्त करून घेतले, अंधश्रद्धा दूर करून घेतल्या, तरी आपल्याला तेवढे हवेच आहे. धम्म वाढवणे म्हणजे धर्मांतर करून घेणे नव्हे. आपले बघून त्यांना आपल्यासारखे व्हावेसे वाटणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडे जायला हवे, वेळ पडल्यास त्यांच्या देवापुढे फुले टाकायला काही हरकत नसावी. संवाद वाढावा, आपोआप तुलना व्हावी. त्यामुळे एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. असे माझे व्यक्तीगत मत आहे. तरी कट्टरता बाळगून धम्माला धर्माच्या वाटेकडे घेऊन जाऊ नये
आता अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचे विषयी बोलू या. ते वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे नेते आहेत. आणि त्यांचा स्वतःचा धर्म (खरे तर धम्म) बौद्ध आहे. त्यांचा हा पक्ष फक्त बौद्ध लोकांचा पक्ष आहे काय?
ते राजकीय नेते आहेत म्हणजे सर्वच जातीधर्माच्या लोकांचे नेते असावेत अशी अपेक्षा आहे. बाबासाहेबांनी हे सांगितले आहे काय की आपण फक्त बौद्धांचेच पक्ष काढून राजकारण करावे? त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार हा पक्ष सर्वच जातीधर्माच्या लोकांसाठी होता. मग बाळासाहेब आंबेडकर जर असे सर्वसमावेशकतेचे राजकारण करीत आहेत तर ते चूक ठरेल काय? विविध गटात विभागलेले ६५.३१ लाख लोक काय राजकारण करणार? तर तात्पर्य हे की कोणीही राजकरणी सर्वांचा असावा, एखाद्याच धर्मासाठी नसावा.
त्यानुसार सर्व धर्मीय आणि सर्व जातीच्या लोकांसाठी बाळासाहेबांना (अन्य कोणालाही) नेता म्हणून समोर यावे लागेल. आणि त्या लोकांचे जे जे प्रश्न असतील ते त्यांची जात, धर्म न पाहता सोडवावे लागतील किंवा त्यासाठी झगडावे लागेल.
ठीक आहे, मग तुमचा प्रश्न असेल पंढरपूर मंदिर प्रवेश हा धार्मिक प्रश्न आहे, त्यात बाळासाहेबांनी का पडावे? तर एक लक्षात घ्या, सध्या मंदिर प्रवेश बंद आहे तो धार्मिक कारणांमुळे नव्हे तर राजकीय कारणांमुळे आहे. म्हणजेच कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितित सरकारने काढलेल्या मंदिर-बंदी आदेशाशी संबंधित आहे. कोरोना काळात असे आंदोलन करावे की न करावे यावर वेगवेगळी मते असू शकतात. परंतु काही हिंदू धर्मीय अनुयायी सरकारी आदेशा विरोधात त्यांची मदत मागू लागले तर त्यांना त्यासाठी प्रयत्न करणे भाग आहे. नाहीतर या लोकांना हिंदुत्ववादी पक्ष हायजॅक करतील. हे लोक हिंदुत्ववाद्यांकडे जाणे म्हणजे तेवढे आपले कट्टर विरोधक तयार होणे. परंतु बाळासाहेबांच्या या प्रयत्नाने हे लोक तिकडे जाणे टळले हे महत्वाचे आहे. दुसरे असे की बाळासाहेब हे सर्वांच्याच प्रश्नात लक्ष घालतात ही प्रतिमा देखील निर्माण होते, आणि तशी होणे आवश्यक आहे. त्या लोकांचा कॉन्फिडन्स वाढणे गरजेचे आहे. याचा पुढे मतांमध्ये फायदा होईल की नाही ही काळच ठरवेल. परंतु आपल्याकडून हा संदेश जाईल की आपण सर्वसमावेशक आहोत आणि आपण सर्वांना आपलेच मानतो.
आणि हे केवळ बाळासाहेबांनीच करावे असे नाही, समाजाला एकत्र बांधण्यासाठी सर्वच नेत्यांनी जे जे शक्य होईल ते करणे आवश्यक आहे.
हे मुद्दे पटोत अथवा न पटोत, एक लक्षात घ्या बौद्ध हा कधीही कट्टर असू शकत नाही. कारण बौद्ध धम्म प्रज्ञेने वागायला शिकवतो, शीलाने वागायला शिकवतो आणि करुणा बाळगायला शिकवतो. हे प्रज्ञा, शील, करुणा अन्य लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. नाहीतर पूर्वी महारवाडा होता, आता कट्टरांचा 'बौद्धवाडा' निर्माण होण्याचा धोका आहे.
टिप्पण्या