वल्लभभाई पटेलांचा एस सी / एसटीच्या आरक्षणाला विरोध होता - प्रा. हरी नरके
*अनुसुचित जाती,जमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल-*
*प्रा. हरी नरके*
************************************
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आणि महात्मा गांधींच्या पाठींब्यामुळे अनुसुचित जाती व जमातींना राज्यघटनेने आरक्षण दिलेले होते. गांधींजींची हिंदुत्ववादी नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला हत्त्या करताच काँग्रेसमधल्या सनातनी गटाने आरक्षणविरोधी उसळी घेतली. त्यांचे नेते होते वल्लभभाई पटेल. पटेल यांचा हिंदुत्ववाद्यांना पुळका असतो, त्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले मुख्य कारण पटेल आरक्षणविरोधी होते हे होय. गांधीहत्त्येच्या अवघ्या २५ व्या दिवशी पटेलांनी आरक्षणविरोधकांची बैठक बोलावली आणि आरक्षण काढून घेण्याचे डावपेच आखायला सुरुवात केली. पटेल घटना परिषदेच्या अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष होते. राज्य घटनेने अनु. जातीजमातींना दिलेले आरक्षण रद्द करावे असा ठराव स्वत: पटेलांनी ३० डिसेंबर १९४८ च्या उपसमितीच्या बैठकीत मांडला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला. ते म्हणाले, " घटना परिषदेने या आधीच आरक्षणाला मान्यता दिलेली असल्याने ते काढून घेण्याचा विषय उपसमितीच्या अधिकारात येतच नाही. सबब हा मुद्दा या बैठकीत आणता येणार नाही." तरिही उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या पटेलांनी डॉ. आंबेडकरांचा हा मुद्दा फेटाळून लावला. जवाहरलाल नेहरूंनी मात्र या बैठकीत मौन धारण केले.
पटेलांनी देशभर या मागणीसाठी सनातन्यांची आंदोलने घडवून आणली. पटेलांनी हीच शिफारस घटनासभेत मांडली असता डॉ. आंबेडकरांनी घटना सभेच्या बैठकीतून सभात्याग केला व पुढील ४ दिवस ते कामकाजाला अनुपस्थित राहिले. त्यांनी घटना समितीचा राजीनामा द्यायचे ठरवले. अनु. जातीजमातींना राज्यघटना संरक्षण देणार नसेल तर अशा घटना परिषदेत मी राहणार नाही असे त्यांनी जाहीर केले.
त्यामुळे नाईलाजाने पटेलांनी माघार घेतली व त्यामुळे अनु. जातीजमातींचे आरक्षण टिकले.
संदर्भ- राजा शेखर वुंद्रू, आंबेडकर, गांधी आणि पटेल, ब्लूम्सबेरी प्रकाशन, नवी दिल्ली, २०२०, पृ. २३१ ते २३९
- प्रा. हरी नरके, ३१/१०/२०२०
टिप्पण्या