स्वा रा ती रुग्णालय, अंबाजोगाई येथे औषधांचा कृत्रिम तुटवडा..?फक्त पित्तनाशक पँटाप्राझोल गोळीवरच दवाखाना चालतो काय..?

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच अभ्यागत मंडळाची बैठक पार पडली. सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन  धनंजय मुंडे यांनी संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत औषध गोळ्या, ऑक्सिजनसह इतर कोणत्याही गोष्टींची कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला खरा. पण, ही औषधे गोरगरिबांना बाह्यरुग्ण विभागातील मेडिकलवर उपलब्ध असतील किंवा नाही याबद्दल मात्र जनतेच्या मनात साशंकताच आहे. याचे कारण असे की या रुग्णांना काही मोजकी औषधं सोडली तर कोणत्याही प्रकारच्या गोळ्या किंवा औषध मिळत नाहीत.



आशिया खंडातील गोरगरीब लोकांचे ग्रामीण रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वा.रा.ती रुग्णालयामध्ये अतिशय माफक दरात उपचार मिळेल. या आशेवर दररोज विविध आजारांनी पीडित हजारोच्या संख्येने रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. त्यांच्यापैकी काही रुग्ण हे गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रस्त अथवा कुठल्या शस्त्रक्रियेसाठी आले असल्याने दवाखान्यातील आंतररुग्ण विभागात त्यांना दाखल करून घेतले जाते. मुख्य आंतररुग्ण विभाग असलेल्या येथे दोन इमारती असून एक शस्त्रक्रिया, प्रसूती, इएनटी, सर्जिकल 'बी' इमारत व वैद्यकशास्त्र विभागाची आयसीयू असलेली मेडिसिन 'ए' इमारत आहे. दोन्ही इमारती मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. सर्जिकल व मेडिसिन इमारतीत दाखल झालेल्या या रुग्णांना देखील काही मोजकी औषधं सोडली तर कोणत्याही प्रकारच्या गोळ्या किंवा औषध मिळत नाहीत. इतकंच नव्हे तर पूर्वी आशिया खंडातील सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये गणल्या जाणाऱ्या या स्वा.रा.ती. रुग्णालयामध्ये दाखल आंतररुग्ण व बाह्यरुणांना सीट्रीझिन, डायक्लोफिनॅक, मल्टीव्हिटॅमिन, पँटाप्राझोल, अँटीबायोटिक म्हणून ऍमोक्झिसिलिन 250/500 मिग्रा सिप्रोफ्लोक्सासीन,सिफिक्साईम,अझीथ्रोमायसीन 250/500 मिग्रा व हृदयरोग असणाऱ्या रुग्णांना मेटप्रोलॉल, लोसारटन, टेलमिसारटन, ऍमलोडीपीन,अटेनेलोल, इनारेप्रिल, आटोर्वास्टॅटिन, ऍस्पिरिन इ. तसेच मधुमेह या आजाराच्या बाह्यरुग्णांना महिन्याकाठी मिळणाऱ्या गोळ्या ग्लिमेपेराईड, मेटफॉर्मिन, वोगल्लीबोज ०.२ इ. 'बाह्यरुग्ण मेडिकल' खिडकी क्रमांक ८ मधून जवळ-जवळ नाहीशा झाल्या आहेत.

गरोदर मातांसाठी जननी सुरक्षा योजनेची टिमकी वाजवणाऱ्या शासनाला सुद्धा याच गरोदर माता स्वा.रा.ती.मध्ये औषधे भेटत नसल्याने बाहेरून विकत घेतांना दिसत नाहीत. गरोदर मातांची पायाभूत गरज असलेल्या साध्या फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन ,कॅल्शियमच्या गोळ्या सुद्धा बाह्यरुग्ण मेडिकलमध्ये उपलब्ध नसतात. याच स्वा.रा.ती. रुग्णालयाच्या नावलौकिकाला शरमेची बाब म्हणजे साधारणतः प्रत्येक रुग्णाला दिली जाणारी पॅरासिटॅमोल 500 मिग्रा ही गोळी सुद्धा डिसेंबर अखेरीस बाह्यरुग्ण विभागातील मेडिकलमध्ये उपलब्ध नव्हती. याची खात्री जेंव्हा महाराष्ट्र न्यूज टुडेने केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी भांडारपाल यांना विचारणा केली असता "डीन सरांनी कालच बैठक घेतली, बघा आज उपलब्ध आहे" असे सांगण्यात आलं.

स्वा.रा.ती. रुग्णालयाच्या वेबसाईटवर औषध खरेदीसाठी महिनाभरापूर्वीचं लांबलचक २९८ औषधींच टेंडर पाहायला मिळत, मग जर खरेदी होत असेल तर त्या औषधी रुग्णांपर्यंत पोचत का नाहीत?  पॅरासीटॅमोल मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्याकरीता अधिष्ठातांना बैठक का घ्यावी लागते ? बैठकीनंतर एका दिवसात पॅरासिटॅमोल कुठून व कशी उपलब्ध होते? केंद्र शासनाकडून घेतलेली औषधे संपली आहेत काय?  संपली असतील तर संस्थेमार्फत खरेदी केलेली भांडारातील औषधे नेमकी जातात कुठे? पालकमंत्री मुबलक औषधसाठा उपलब्ध करून देतीलही, पण तो या गोरगरीब जनतेपर्यंत पोहचल का..? असे एक ना अनेक प्रश्न बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या गोरगरीब जनतेतून विचारले जात आहेत.

**'औषधांची उपलब्धता' ही गोपनीय माहिती असते, ती जाणून घेण्यासाठी माहिती अधिकारात अर्ज करा' - डॉ. आनंद काळे, विभाग प्रमुख, औषधशास्त्र विभाग

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी परत न्यूज महाराष्ट्र टुडेने आठवडाभरापूर्वी दिलेल्या औषध उपलब्धतेची माहिती घेण्यासाठी केलेल्या लेखी अर्जावर काय कार्यवाही केली हे जाणून घेण्यासाठी अधिष्ठाता कार्यालयास भेट दिली. परंतु, अधिष्ठाता मुंबईला गेल्याचे समजल्यावर परत भांडार विभागास भेट दिली असता तिथे औषध विभाग प्रमुख डॉ. आनंद काळे यांनी सदरील माहिती ही गोपनीय असल्याकारणाने ती माहिती अधिकार अर्जाद्वारे मागवण्याचा नम्रतापूर्वक सल्ला दिला. अशी माहिती साध्या अर्जावर आम्ही कोणालाही कशी देऊ, औषध साठा खूप कमी आहे, आम्हाला औषधे उपलब्ध करण्यासाठी फार त्रास सहन करावा लागतो, कधी-कधी एखादे औषध उपलब्ध करण्यासाठी पाच-पाच,सहा-सहा आठवडे लागतात, असे सांगण्यात आले. मात्र भांडारपाल यांच्या म्हणण्यानुसार उपलब्धतेविषयी लपवण्यासारखं काहीच नाही, सर्व उघड-उघड आहे. फक्त मी माहिती देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. आणि शेवटी तर चक्क स्वतः अधिष्ठाता यांनी आदेशित करूनही औषध उपलब्धतेविषयी माहिती न दिलेलं, जाणूनबुजून भिजत ठेवलेल घोंगड मुजीब शेख यांच्याकडे असल्याचे व ते त्यांच्याकडूनच घेण्यास सांगितलं गेलं. 'औषध उपलब्धता किती आहे' हा विभाग प्रमुखांच्या दृष्टीने गोपनीय विषय आहे मात्र भांडारपाल यांच्या मते सगळं उघड-उघड आहे, लपवण्यासारख काही नाही, हा एकाच विभागातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये विरोधाभास कसा ? औषधांची उपलब्धता जर गोपनीय माहिती असेल तर मग माहिती अधिकार कायदा-२००५ च्या कलम ४ प्रमाणे जनतेसाठी खुली ठेवण्यायोग्य माहिती कोणती असावी? माध्यमांना सुद्धा माहिती न देण्यामागच रहस्य काय ? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे